मना सज्जना भक्तिपंथें चि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावे ।
जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ।।२।।
हे सर्व मनाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तांत आहेत. या वृत्तांत प्रत्येक ओळीत १२ अक्षरें व ४ य गण असतात. ३ अक्षरांच्या गटांचा एकेक गण होतो. य गणामध्ये पहिलें अक्षर र्हस्व व दुसरी दोन दीर्घ अशी रचना असते. या रचनाविशेषामुळे भुजंगप्रयातातील काव्याला एक आकर्षक खटका, ठेका, ताल प्राप्त होतो आणि त्यामुळें या वृत्ताच्या माध्यमांतून सांगितलेल्या उपदेशाला एक प्रकारचा प्रभावीपणाहि येतो.
समर्थ जनसंपर्कासाठी घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. घराघरांशीं संबंध यावा आणि जागृतीचें कार्य प्रत्येक ठिकाणीं पोचावें या दृष्टीनें ही भिक्षेची पद्धत फार सरस ठरली असली पाहिजे. विरक्तीला बाध नाही. कोणावर तसें आग्रही ओझें नाहीं आणि कार्यकर्त्याची उपासमार नाही. व्यक्तीव्यक्तीशी संबंध, कुटुंबाकुटुंबाचें निरीक्षण या गोष्टी सहज घडत असल्यामुळें जागृति करणेंहि सोपे. भिक्षा मागताना रामदासी लोकांना उपयोगी पडावे म्हणून हे श्लोक समर्थांनीं रचले असें म्हणतात.
समर्थांच्याकाळीं मुसलमानी राजवट बद्धमूल झालेली होती. मुसलमान फकीर घरोघर भीक मागत हिंडत असत. खटकेदार गज्जला म्हणत ते आपल्या धर्माचा प्रचार करीत भोळ्या-भाबड्यांची मने आकर्षून घेत. लोकहि त्यांच्या भजनीं लागत. दर्गेपिरांना नवस करीत. त्यांच्या उरूसांत दिमाखानें भाग घेत. स्वाभिमान नष्ट झाला होता. स्वत्व उरले नव्हतें. या आपत्तींतून लोकांना हळुवारपणें बाहेर काढणें अत्यंत आवश्यक होते. समर्थांसारखा थोर पुरुष, देशकालपरिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला थोर विचारवंत अशा वेळी व्यवहाराच्या दृष्टीनें तटस्थ राहणें, उदासीन राहणें शक्यच नव्हतें. "बुडत हे जन देखवेना डोळा । म्हणून कळवळा येतो मज ।" अशी त्यांची वृत्ति या कळवळ्यांतूनच त्यांना मनाच्या श्लोकांसारखे प्रभावी काव्य स्फुरले असले पाहिजे. गज्जलांच्या प्रचाराला प्रभावीपणें तोंड देण्यासाठी त्यांच्याचसारखा ताल ठेका असलेला हा भुजंगप्रयाताचा छंद त्यांनी निवडला असेल अशीहि शक्यता आहे.
सकाळची प्रसन्न वेळ. सडारांगोळीने शृंगारलेले अंगण आणि त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ उभे राहून समर्थांसारखा तेज:पुंज, वैराग्यसंपन्न, योगीराज, मेघासारख्या करुणागंभीर ध्वनीनें या मनाच्या श्लोकांची साद घालीत असेल त्यावेळी व्यक्तिव्यक्ति स्वधर्माच्या स्वाभिमानाने, आत्महिताच्या प्रेरणेने जागृत होऊन कोणत्याहि त्यागाला सिद्ध होत असेल यांत शंकाच नाही. वाढली जाणारी भिक्षा कदाचित या त्यागाच्या सिद्धतेचेंच छोटेसे प्रतीक असेल.
असेल गरज तर वागतील चांगले. त्यांना हवें असले तर येतील माझ्याकडे, असें उपेक्षेने न म्हणतां आळसानें झोपेच्या गुंगीत गढून गेलेल्या मुलाला अभ्यासासाठी आईने हालवून वा पाण्याचा शिडकावा टाकून जागें करावें त्याप्रमाणें समर्थ हे जनजागृतीचे कार्य स्वत: वा शिष्यांकरवी करीत असत. सारा भारतवर्ग परक्यांच्या टाचेखाली चिरडला जात असतांना महाराष्ट्रांत तेवढें स्वराज्य उभे राहिले त्याला तुकाराम महाराजांची आणि समर्थांची घरोघर जाऊन पोंचणारी अमृतवाणीच पोषक ठरली असली पाहिजे.
सर्व संत योग्यतेने कितीहि एकमेकांसारखे असले तरी अवतारकार्याच्या दृष्टीने त्यांनीहि प्रकृतिभेद धारण केलेला असतो हेच खरे. ऐकण्याची इच्छा नाहीं तर सांगा कशाला असें न म्हणतां कधीं हनुवटी धरून वात्सल्यानें, तर कधी मुस्काडीत मारून वात्सल्यगर्भ कठोरतेने समाजाला शिकवण्याचें कार्य महाराष्ट्रांत त्याकाळी दोन संतांनी केले. एक तुकाराम महाराज व दुसरे समर्थ रामदास स्वामी. दोघेहि चांगलेच तापट व फटकळ आहेत. आणि दोघांच्याहि हातांत दंडुका आहे. करूणरसानें भरलेल्या मेघाजवळ कडकडाट करणारी तळपती वीज असावी तसेच हें आहे.
मला वाटते– रामकृष्ण परमहंसांनीं सद्गुरूंचे तीन प्रकार केले आहेत. एक सद्गुरू केवळ रस्ता दाखवितात व आपल्या ठिकाणी बसून थोड्याशा खाणाखुणा सांगतात. दुसर्या प्रकारचे सद्गुरू मार्गातील अडचणी, वळणे, वळसे, सोयी, निवासस्थले इत्यादी बारीक सारीक खांचाखोंचा सांगून मार्गावरील प्रवासाची नेमकेपणाने कल्पना देतात. तिसर्या प्रकारचे सद्गुरू वरील दोन्ही तर करतातच पण प्रसंगविशेषी शिष्याचा कान धरून त्याला वठणीवर आणतात व त्या मार्गाने ओढीत नेतात, कधी उचलूनहि नेतात. हे तिसर्या प्रकारचे सद्गुरुत्व फार दुर्मिळ आहे. यासाठी सद्गुरूचें ठिकाणी स्वसामर्थ्याविषयींचा अलौकिक विश्वास पाहिजे. आणि शिष्यहि तितका निष्ठावान् पाहिजे. गुरूने थोडा आवाज चढवून बोलतांच वा मनाविरुद्ध वागतां-सांगतांच ज्यांची शिष्यत्वाचे त्यागपत्र देण्याची सिद्धता असते त्याचा कान गुरू कशाकरितां धरील आणि कां धरावा? गुरूने कान धरला तरी पुढे चालावयाचें असते ते स्वत:च्याच पायाने व हें कान धरणेंहि आरंभी आरंभीचें व लाक्षणिक स्वरूपाचें असतें. मार्गक्रमणाचें तें कांही वाहन नव्हे. कितीहि मोठे सद्गुरु अवतरले तरी मनुष्यजातीतील उद्धाराचे प्रमाण अत्यल्पच राहिले आहे. हे कां तें लक्षांत यावें म्हणूनच हें सांगितलें. असो. तुकाराम महाराज काय किंवा समर्थ रामदास स्वामी काय हे या तिसर्या प्रकारांत बसणारे सद्गुरु आहेत.
परमार्थात काय किंवा व्यवहारांत काय कोणी खरें तें ऐकत नाहींत. त्याला खरें नकोहि असतें. स्वत:च्या मताला व वर्तनाला पाठिंबा देणाराच कुणी असेल तर तोच प्रत्येकाला बरा वाटतो. त्यामुळें मला स्वत:ला रस्ता दाखविणारे पहिल्या, फार तर दुसर्या वर्गातील गुरु चांगले वाटतात. सध्यांचा काळ तरी तिसर्या वर्गातील गुरूला अनुकूल असेल असें वाटत नाहीं. गुरु कान धरण्यास जाईल तर त्याचा अपमान होईल हेंच खरें. उपदेशकाची भूमिका पंढरपूरला जाण्याचा रस्ता दाखविणार्या पाटीसारखी असावी. पंढरपूरला जावयाचे कां नाही तें जाणारानें आपल्या इच्छेनें पाहिजे तसें ठरवावें. पाटी ज्या खांबावर लावलेली असते त्या खांबाभोंवती क्वचित् उकिरडाहि सांचलेला असतो पण पाटी आपले रस्ता दाखविण्याचें काम करीत असते.
माणसे नम्रतेचा आव कितीहि आणीत असली तरी बहुधा आपले सोडावयास तयार नसतात. कांहीं रोगी जसें भेटेल त्याला औषधें व पथ्यें विचारतात आणि मग आपल्या सोयीनें एकाचें औषध व दुसर्याचें पथ्य करतात तसेंच पुष्कळ माणसें परमार्थमार्गांत वागत असतात. खरोखरीच कोणाविषयीं कोणाला आदार नसतो. कोणी कोणाला भीत नसते. आदर आणि भय हे भाव प्रगट होत असतील तर त्याच्या बुडाशी कोठे तरी स्वार्थ लपलेला असतो. आदर वा भय आहे म्हणण्यानें म्हणणारा विनयी ठरतो; व ज्याच्याविषयीं ते भाव आहेत म्हटले जाते तो मोठा ठरतो. त्याच्या थोरवीची प्रसिद्धि होते. अंत:करणांत भय वा आदर खरेंच असेल तर त्या आदरणीय व्यक्तीला न आवडणारी गोष्ट माणसाच्या हातून कधींहि घडली नसती. आपण विनयी आहों या सूक्ष्म अहंकारानें, 'वाटलें तर ऐका' असें म्हटलें तर तेंहि माणसाला आवडत नाहीं व नेमकें आग्रहानें सांगितलें तर तें त्याला पटतहि नाहीं आणि म्हणून व्यवहारांत कान धरून नेणें शक्य नसतें. तोहि जुलुमाचा रामराम ठरतो. समर्थांची वृत्ति मात्र कुणी ऐकत नाहीं म्हणून स्वस्थ बसणारी नव्हे. ते सर्व परिस्थिति विचारांत घेऊन योग्य तें आग्रहानें सांगत राहणारच. समर्थांनी मनाला उपदेश केला आहें आणि अवखळ मुलाला आंजारून-गोंजारून त्याच्याकडून काम करून घ्यावें तसें समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधीत आहेत.
खरें म्हणजे परमार्थमार्गातील सर्व आपत्तीचें मूळ मनच आहे. "करुं कायी करुं कायी । मन हें ऐकत नाहीं । बुद्धि कराया पुण्य जाय । परि मन खेंची अघडोहीं ।।'' असें श्रीसद्गुरु दासगणूमहाराजांनीं म्हटलें आहे तें यासाठींच. तो बहुधा सर्वांचा, सर्वकाळचा अनुभव आहे. शास्त्रकारहि ''मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:'' असेंच सांगतात. अर्जुनासारख्या विलक्षण सामर्थ्य असलेल्या पुरुषालासुद्धां
``चंचलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।'' (भ. ६।३४)
असें म्हणण्याची पाळी येते. ते कठीण आहे, बलवान आहे, अवखळ आहे, हट्टी आहे. नाठाळ मुलासारखे आहे. अज्ञानीहि आहे. म्हणून बाळ मोठा शहाणा ! म्हटलें कीं ऐकण्याची शक्यता निर्माण होते. त्याला बळानें वाकविणें फारसें शक्य नसतें. त्याच्या कलानेंच घ्यावें लागतें. मन जर खरेंच सज्जन असतें तर त्याला आवर्जून भक्तिमार्गाला जा असें सांगण्याचे कारणच पडलें नसतें.
असें असले तरी मनाचा एक गुण मोठा चांगला आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "कां जे यया मनाचें एक निकें । जें हें देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणून अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाईजे ।। (ज्ञा. ६।४२०) मनाला एकदां एखाद्या गोष्टीची गोडी लागली की तें मग त्याला चिटकून राहते. सत्त्व हा मनाचा मूळ स्वभाव. म्हणून तर सर्व माणसे स्वभावत: भजनशील असतात. "देखे मनुष्यजात सकळ । स्वभावत: भजनशील–'' (ज्ञा. ४।६७) पण माणसाच्या मनाचें हें मूलभूत सात्त्विकपण जन्मजन्मांतरीच्या रजोगुण-तमोगुणांच्या प्रभावानें लुप्त झालेले असते. स्वार्थांतून निर्माण झालेल्या काम-क्रोध-लोभ-मोह इत्यादि विकारांनी माणसाचे जीवन झांकोळलेले असतें. तेच संस्कार मनावरहि होतात. मन हें स्वत:च्या कर्तृत्वानेंच दुर्जनतेच्या पातळीवर उतरलेलें आहे. सभोवतीची परिस्थिति सुसंस्काराला अनुकूल नसली की मग हा बिघाड वाढू लागतो. घातकतेच्या पातळीवर पोंचतो. दुर्दैवानें गेल्या पन्नास पाऊणशें-वर्षांत चांगले संस्कार बुद्धिपुरस्सर घडविले पाहिजेत ही विचारसरणी जुनाट वाटूं लागली आहे. इतिहास-भूगोल शिकवावे लागतील. गणित शिकवावें लागेल पण नैतिकता कशाला शिकवावयाला हवी असें म्हणून क्रमिक पुस्तकांत चुकून माकून आलेले नैतिकतेचे पाठ त्यांची थट्टा करून टर उडवून, बाजूला काढले गेले. त्या उपदेशाचें विडंबन झाले. परिणाम असा झाला की आजची तरुण पिढी कुठेंतरी भरकटली. शिक्षण घेऊनहि तिच्यावर संस्कार झाले नाहीत. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकणार्या अगदीं कोंवळ्या युवकांतहि गुप्तरोगासारख्या घाणेरड्या विकारांचें प्रमाण वाढू लागले आहे. ही घटना विचारी माणसाचें हृदय पिळवटून टाकणारी नाहीं काय? बहुसंख्य घरांतून सुसंस्कार होईनासे झाले आहेत. त्यामुळें क्वचित् कोठें घरांतून चांगले संस्कार असले तरी त्या घरांतील मुलंहि चांगलीच निघतील याचा भरंवसा उरलेला नाहीं. घरांघरांतील आन्हिक म्हणजे बापानें दाढी घोटणें आणि आईनें आरशापुढें उभे राहून प्रसाधन करणें एवढेंच असेल, वडील-धार्या मंडळींच्या तोंडी मोठ्या पदावरील राजकीय पुढार्यापासून शाळेंतील शिक्षकापर्यंत सर्वांना उद्देशून तुच्छतेचीच भाषा असेल, स्वत:ची व्यसने आणि व्यवहारांतील खोटेपणाचें वर्तन मुलांच्या समोर उघड होण्यात खंत नसेल तर मुलांवर चांगले संस्कार कसे घडणार?
परिसीमेचा चांगला आणि टोंकाचा वाईट असा स्वभाव सोडून दिल्यास शेंकडा ८०-९० लोकांवर तरी संस्काराचे परिणाम होतात, व चांगले किंवा वाईट वळण लागतें. आईबाप अगदी चांगले, सद्वर्तनी असूनहि मुलें वाईट निघत नाहींत असें मुळींच नाहीं. पण त्यामुळें सुसंस्कार केले पाहिजेत या विधानाला बाध येत नाहीं. एकादे मूल कितीहि खायला घातलें तरी लठ्ठ होत नाहीं. अन्न त्याच्या अंगी लागत नाहीं. अशा मुलाला कशाला जेवायला घालायचें असें म्हणून चालतें कां? एकादा रोग औषध घेत असतांनाहि बरा होत नाहीं. पण औषध घेत आहे तोपर्यंत रोग वाढत नाहीं, हा तरी औषधापासून होणारा लाभच नाहीं काय? तसेंच संस्काराचेंहि आहे. म्हणून सुसंस्कार करीत असले पाहिजे. सदुपदेश केला पाहिजे. संस्कार होऊं शकत नसतील तर ते होतील अशी परिस्थिति प्रयत्नपूर्वक निर्माण केली पाहिजे. त्या दृष्टीनें यथाशक्य दक्ष राहिले पाहिजे. याच दृष्टीनें समर्थ मनाला उपदेश करीत आहेत. मन मूलत: सत्त्वगुणांचें आहे. म्हणून समर्थ त्याला सज्जन म्हणून त्याच्या सात्त्विकतेची जाणीव करून देत आहेत असें समजावे किंवा नाठाळ मनाला थोडे गोंजारीत आहेत, असेंहि समजावें.
समर्थ म्हणतात मना, तू भला आहेस. सज्जन आहेस. तेव्हां सज्जनानें सज्जनासारखेच वागलें पाहिजे. तू स्वार्थात, विषयोपभोगांत, चैनींत लोभांत, लबाडीत, दुष्टतेंत गुंतून राहतोस हे बरें नाही. ते तुझ्या सज्जनपणाला शोभणारे नाही. भजनमार्गाला लागणें, भक्तीची वाटचाल करणें हेंच सज्जनपणाला खरोखरी शोभणारें लक्षण आहे. तू हा भक्तीचाच श्रेष्ठ मार्ग धर. म्हणजे तुला श्रीहरीची, परमेश्वराची प्राप्ति स्वभावत: होईल, सहजासहजीं होईल. कारण इतर कोण्याहि उपायापेक्षा, साधनापेक्षां मार्गापेक्षां, भक्तीचा मार्ग ईश्वरापर्यंत जाऊन पोचण्याच्या दृष्टीनें तुलनेनें अधिक सोपा, अधिक जवळचा आणि अधिक निश्चयाचा आहे. सर्व मनाच्या श्लोकांमध्ये या भक्तिमार्गाचेच वर्णन सविस्तर व निरनिराळ्या अंगांनी यावयाचें आहे.
समर्थ पहिल्या श्लोकांत राघवाच्या मार्गाला लागू असें म्हणतात. आणि या पुढच्या श्लोकांत भक्तिपंथानें गेलें म्हणजे श्रीहरीची भेट होते असें म्हणतात. यावरून समर्थांना राघव आणि श्रीहरि म्हणजेच राम आणि कृष्ण यांच्यांत भेद वाटत नव्हता हे सिद्ध होतें. आणि तरी कांही वारकरी मंडळी समर्थ रामदासस्वामींविषयी दुर्जपणा दाखवतात याचा खेद होतो. असो, नवीन तरुण पिढीने तरी या भेदबुद्धीपासून दूर राहावे एवढ्याकरितांच हा उल्लेख केला. राघवाचा आणि श्रीहरीचा मार्ग वेगळा नाहीं, एकच आहे. उपासनेनें शुद्ध झालेल्या बुद्धीने चित्त समाधींत लीन झाल्यावर नंतर जें दिसतें तें एक आत्मतत्त्वच, साक्षात्कार होतो तो एका आत्म्याचाच. त्याचें वर्णन मात्र शब्दप्रभू महात्मे भिन्नभिन्न साधकांच्या प्रगतीसाठी अनेकविधरीतीनें करीत असतात. यासाठी विचारवंतांनीं तरी नामभेदानें बिचकून जाऊ नये. नामभेदामागे एकच तत्त्व असतें हा वेदाचा आदेश लक्षांत ठेवावा हें ध्यानांत यावे यासाठी समर्थ एकदां राघव, एकदां श्रीहरि असा उल्लेख बुद्धिपुरस्सर करीत असावेत असें मला वाटतें. एकविधा भाव हा भक्ताचा स्वधर्म असला तरी त्यानेंहि विवेक सोडूं नये, हट्टाग्रही होऊं नये. भक्तिमार्गांतहि हे लक्षांत ठेवलें पाहिजे, यासाठींच समर्थ असें सांगत आहेत.
समर्थ भक्तिमार्गाला लागा असें मुद्दाम म्हणतात. कर्म, योग, ज्ञान, हेहि मार्ग असून त्याचा उल्लेख करीत नाहींत. याचें महत्त्वाचें कारण असें की सर्वसामान्यांच्या मनोवृत्तीच्या दृष्टीने गोडी वाटण्यासारखी परिस्थिति जेवढी भक्तिमार्गात आहे तेवढी इतर मार्गात नाहीं. इतर मार्गांत चूक सुधारण्यास फारसा वाव नसतो. भक्तिमार्गांत झालेल्या चुका सुधारण्याची संधि इतर कोणत्याहि मार्गांपेक्षां अधिक असते. आणि म्हणून अन्य सर्व संतांप्रमाणेंच जीवानें भक्तिमार्गाला लागावें असाच समर्थाचाहि आग्रह आहे.
भक्तिमार्गाला लागावें म्हणजे काय करावें. तेहि समर्थ क्रमाक्रमानें सांगणार आहेत. वाईट, अहितकर तें टाकावें, चांगलें हितकर तें निष्ठेनें स्वीकारावें ही या भक्तिमार्गांतील आचाराची पहिली पायरी. हें चांगलें-वाईट तरी कसें ठरवावें? तर्काच्या आणि शास्त्रप्रामाण्याच्या भरीला पडले तर निबिड अरण्यामध्यें शिरल्यावर होतें तसेच होणार. म्हणून समर्थ त्याचाहि व्यावहारिक मार्ग सांगत आहेत. संभावित लोक सामान्यत: ज्याला वाईट म्हणतात तें वाईट समजून टाकून द्यावें आणि भली माणसें ज्याला चांगलें म्हणतात त्याचा प्रयत्नपूर्वक स्वीकार करावा आणि मन:पूर्वक तें आचरणांत आणण्यासाठीं झटावें.
सामान्यत: दुर्जन जरी असला तरी तो दुष्कृत्याचें उघड समर्थन करीत नाहीं. करीत नव्हता असें म्हणा पाहिजे तर. दरोडेखोरांचाहि आपसांतील प्रामाणिकपणावर विश्वास असावा लागतो. आपल्या जुन्या वाङ्मयातील चार्वाक हा स्वैराचाराचा पुरस्कर्ता मानला जातो. पण तोहि आजच्या नवमतवादी विचारसरणीपेक्षां पुष्कळ बरा म्हणण्याची वेळ आली आहे. कर्ज काढून तूप पिणें ही त्याच्या स्वैराचाराची परिसीमा आहे. यालाच तो सुखाचें जीवन म्हणतो. तूप खाल्ल्यामुळें बुद्धि वाढते आणि शुद्ध होते. शरीरहि सशक्त होतें. आयुष्य वाढतें. कर्ज मिळण्यासाठीं पत वाढवावी लागते. या सर्व गोष्टी परिणामीं हिताच्याच ठरूं शकतात. चार्वाकहि चोरी करून दारू प्यावीं असें म्हणत नाहीं. क्रौर्याचा आणि व्यसनाचा पुरस्कार तोहि करीत नाहीं. वाईटाचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार करण्याची सवय शरीराला आणि मनाला लागली की त्याचा विवेक वाढू लागतो. संयम अंगवळणीं पडतो.
लोकांमध्यें रूढ असलेल्या चांगल्या वाईटाच्या कल्पना या अनेक पिढ्यांच्या अनुभवावर आधारलेल्या असल्यानें कोण्या एकाच्या कल्पनेला वाटणार्या बर्यावाईटाच्या विचारापेक्षां अधिक प्रामाणिक असतात, अधिक विश्वासनीय असतात म्हणून आरंभी तरी या लोकमताचाच आदर करावा असें समर्थांनीं सांगितलें आहे.